Tuesday, September 21, 2010

खरं कारण काय?

नोकरीनिमित्ताने केलेल्या माझ्या बेळगावच्या वास्तव्यादरम्यान माझा सिमेन्स, मुंबईच्या एका अधिकार्‍याशी परिचय झाला. हे गृहस्थ (ह्यांच्या नावाची इनिशिअल्स एसबी. पुढे ह्यांचा असाच उल्लेख केला जाईल) मोठे रसिक आणि कलासक्त (आणि मुख्य म्हणजे देव आनंद चे ग्रेट फॆन) त्यामुळे आमच्या गप्पा मस्त रंगायच्या. कलाक्षेत्रातल्या अनेक मंडळींना ते जवळून ओळखतात हे मला त्यांच्याशी बोलताना समजले. त्याचे कारण विचारताच त्यांनी सांगितले ती अमूक एक गायिका - ती ह्यांची आत्या (इथे नाव लिहीत नाही पण पुढे जे वर्णन येईल त्यावरून चाणाक्ष वाचक ओळखतीलच म्हणा..).

आता एसबी साहेबांचा स्वभाव एकदम मनमोकळा त्यामुळे माझ्या मनात अनेक वर्षांपासून खदखदत असलेला प्रश्न त्यांना विचारावा असे मला वाटले. आणि अगदी सहजच बोलल्यासारखा मी त्यांना म्हणालो, "एसबी साहेब, तुमच्या आत्याचा आवाज अगदी हुबेहूब लता मंगेशकरांसारखा आहे, पण लताजींच्या तूलनेत त्यांनी फारच थोडी गाणी गायलीत. गेली अनेक वर्षे मी असं ऐकत / वाचत आलोय की लताजींनी राजकारण करून तुमच्या आत्याबाईंना पुढे येऊ दिलं नाही. याशिवाय काही काळापूर्वी वर्तमानपत्रात तुमच्या आत्याबाईंची मुलाखत वाचली तेव्हा त्यांनी या गोष्टीचा साफ इन्कार केलाय. त्या म्हणतात ’माझ्या व्यावसायिक पिछाडी बद्दल दुसर्‍या कुणाला जबाबदार धरले जाऊ नये. मी मागे पडले कारण माझे लग्न झाले, संसार चालु झाला. ज्याप्रमाणे एखादी नोकरी करणारी स्त्री लग्नानंतर प्रापंचिक जबाबदार्‍यांमुळे नोकरी सोडते तितक्याच सहजतेने मी गाणे सोडले’. मग आता तुम्हीच सांगा खरं कारण काय? तुमच्या आत्याबाईंची कारकीर्द नेमकी कशामुळे संपुष्टात आली?"

एसबी साहेब उत्तरले, "त्याचं असं आहे चेतन, ही दोन्ही कारणं तितकीच खोटी आहेत. खरी गोष्ट अशी की आमच्या आत्याचे नाव त्याकाळच्या एका नामांकित हिन्दी-मराठी चित्रपटांच्या संगीतकाराबरोबर (यांचंही नाव इथे मी लिहू शकणार नाही पण वाचक अंदाज लावू शकतात) जोडले जाऊ लागले होते व त्यात काही प्रमाणात तथ्यदेखील होते याची प्रचीती आल्यावर आत्याच्या यजमानांनी आमच्या आत्याचं गाणं बंद करायला लावलं. आता आमची आत्या मुलाखतीत तिची व्यावसायिक कारकीर्द संपुष्टात येण्याच हे खरं कारण कुठल्या तोंडानं सांगणार?"

No comments:

Post a Comment