Friday, October 8, 2010

धर्माच्या नावाचे ब्रॆन्डींग, पण फक्त सोयीचे असेल तिथेच...

जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रॆंड आहे. होय हा ब्रॆंड आहे असे मी म्हणतोय कारण मी हॊटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे मंहमद मुस्लीम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हीड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत. पण राजीव जैन, राकेश जैन, महावीर जैन, अशोक जैन असे अनेक जैन बांधव माझ्या परिचयाचे आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या उद्योगांना नाव देतेवेळी जैन शब्दाचा प्रकर्षाने वापर केला गेला आहे - जसे की, जैन टीवी, जैन इरिगेशन, इत्यादी. हिंदू ह्या वर्तमानपत्राचा अपवाद वगळता मला जैनेतर कुठल्याही धर्माचा कुठल्या ही उद्योगाकरिता फारसा वापर केल्याचे आढळलेले नाही.

जैनांनी आपल्या धर्माला (म्हणजे फक्त जैन या शब्दाला) अशा प्रकारे आपल्या रोजच्या व्यवहारातील पदार्थांना, स्वत:च्या नावाला, उद्योगाच्या नावाला जोडून त्याचा उच्चार जास्तीत जास्त वेळा कानावर पडेल अशी व्यवस्था करून ठेवलीय. डिसेंबर १९९९ ते फेब्रुवारी २००० दरम्यान मी बिहार मधील एका अतिशय प्रसिद्ध अशा जैन धर्मीयांच्या सामाजिक संस्थेत दोन महिने काम केले होते, त्यावेळी माझ्या पाहण्यात असे आले की तिथल्या जैन साध्वी वेगळ्या प्रकारची पादत्राणे वापरतात (ज्यात प्राण्यांच्या कातडीचा वापर केला गेला नाही). त्याचप्रमाणे त्या काळी वापरात असलेला रोल फिल्मचा कॆमेरा त्यांना चालत नसे. त्यांचे फोटो काढण्यासाठी डीजीटल कॆमेराच वापरला जावा असा त्यांचा आग्रह असे (तेव्हा डीजीटल कॆमेरा अतिशय महाग - साधारणत: रू.५०,०००/- च्या आसपास होता). रोल फिल्म ला प्राण्यांपासून मिळविलेले जिलेटीन लावलेले असते असे त्यांचे म्हणणे होते.

अशा प्रकारे आपल्या धर्मातील तत्वांचे अनुसरण करण्यात हा धर्म अतिशय काटेकोर असल्याचे इतरही अनेक प्रसंगी दिसून येते. उदाहरणार्थ, मांसाहारी व्यक्तिंना आपल्या वसाहतीत जागा न देणे, महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे, तसेच हा अथवा इतर कोणताही जैन सण व मुस्लिमांची बकरी ईद एकाच दिवशी आल्यास मुस्लिमांना त्यांचा सणात केला जाणारा बकर्‍याच्या आहूतीचा विधी पुढे ढकलण्याची प्रेमळ सक्ती करणे. (खरे तर हे सायकल ने ट्रक ला "मला वाट देण्याकरिता बाजूला हो" असे सांगितल्या सारखे वाटते. गंमत म्हणजे मुस्लिम बांधव ही जैनांची ही सूचना विनातक्रार मान्य करतात.)

आता या सगळ्या गोष्टींमुळे जैन धर्माची तत्त्वे या समाजात अगदी खोलवर रुजली आहेत असा भास होतो. पण यातला फोलपणा जाणवून देणार्‍या काही गोष्टी मला इथे मांडाव्याशा वाटतात.

१. परवाच वीसीडीवर २०१० चा अतियशस्वी चित्रपट राजनीती पाहत होतो. चित्रपट जास्त कंटाळवाणा होता की त्यात ठराविक अंतराने सतत त्रस्त करणार्‍या अल कबीर च्या जाहिराती जास्त कंटाळवाण्या होत्या हे काही मी ठरवू शकलो नाही. या अल कबीर ला इतके वर्ष जाहिरातीची फारशी गरज कधी पडली नव्हती आणि तरी देखील हा आशियातला सर्वात मोठा कत्तलखाना आहे. या कत्तलखान्याच्या भागीदारांपैकी सर्वात मोठा भागीदार हा जैन धर्मीय आहे. (संदर्भ: http://visfot.com/index.php/jan_jeevan/477.html). म्हणजे जैनांच्या नेहमीच्या सवयीनुसार या कत्तलखान्याच्या नावात जैन शब्द असायला हवा होता पण ते गैरसोयीचे असल्याने तसे केले गेलेले नाही.

२. पुण्यातील आकुर्डी येथे एक जैन स्थानक (जैन धर्मीयांचे प्रार्थना स्थळ) आहे. या स्थानकाच्या १०० मीटर परिसरात एक परमीट रूम उघडण्यात आले आहे. धार्मिक स्थळाच्या १०० मीटर परिसरात मद्य विकण्यास कायद्याने परवानगी नाही तरीही असे राजरोसपणे चालु आहे कारण या स्थानकाच्या विश्वस्तांपैकीच एक जण हा त्या परमीट रूमचा देखील भागीदार आहे. यावर कडी म्हणजे या परमीट रूमला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा स्थानिक नगरसेवक मुस्लिम धर्मीय आहे.

या दोन अतिशय प्रातिनिधिक घटना आहे. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. माझा मुख्य आक्षेप असा आहे की, जैन बांधव आपल्या धार्मिक तत्त्वांचे जिथे तिथे गोडवे गात फिरत असतात. इतरांनाही अहिंसा, सदाचार व शाकाहाराचा संदेश देतात (ज्याविषयी माझी काहीच हरकत नाही), पण मग त्यांनी वरील दोन घटनांचा तीव्र विरोध व जाहीर निषेध का केला नाहीय? जैन लोकांचे प्रसारमाध्यमात व समाजाच्या इतर क्षेत्रांमध्येही लक्षणीय प्राबल्य आहे; त्याचा उपयोग करून ते मनात आणले तर आपल्या बांधवांकडून घडणार्‍या अशा गोष्टी निश्चितच थांबवू शकतात.

मला हे ठाऊक आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांपैकी काही जण अशा प्रकारे चूकीचे आचरण करत असतील पण जेव्हा आपण परधर्मीयांच्या अशा आचरणाचा निषेध करतो तेव्हा प्रथम स्वधर्माच्या लोकांकडून असे काही घडत नाहीयना याची खात्री करून घ्यायला हवी आणि तसे घडत असेल तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वत: एक जैन धर्मीय या नात्याने या ब्लॊगवर करीत आहे.

5 comments:

  1. चेतनजी तुम्ही एका विशिष्ट धर्मातील काळ्या बाजूची माहिती दिली आहे आणि असे बरेच प्रसंग धर्माच्या नावाखाली तथाकथित धार्मिक पुढारी करत असतात.

    ReplyDelete
  2. मी एका विशिष्ट धर्मातील काळ्या बाजूची माहिती दिली आहे कारण मी स्वत: त्या धर्मात जन्माला आलो आहे. मला वाटते प्रत्येकाने स्वत:च्या धर्मातील चूकीच्या बाबींवर टीका करावी म्हणजे प्रबोधन तर साधले जाईल पण सोबत कटूताही टाळली जाईल.

    ReplyDelete
  3. इथे प्रथम दिलेली प्रतिक्रिया पोस्ट झाली नाही म्हणून पुनः देत आहे.

    चेतनजी मुद्दा एकदम योग्य आहे. पण आजच्या युगात खरा धर्म पैसा हाच आहे. बाकीचे सगळे धर्म हे खरं तर दाखवायचे दात आहेत.. खायचे दात म्हणजे खरा तो एकची धर्म "पैसा". या धर्माच्या हितसंबधातचं सगळे बुडालेले असल्याने तुम्ही म्हणत असलेल्या शुल्लक बाबीकडे कोण कशाला हो लक्ष देईल.
    मग तो जैन असो हिंदू वा मुस्लीम. हे सगळे मिडिया आहेत पैसे कमवायचे म्हणजे खऱ्या धर्माकडे जायचे रस्ते आहेत....असो...उरलेले पुन्हा केंव्हातरी.

    ReplyDelete
  4. हे टेम्प्लेट वं रंगसंगती आधीपेक्षा बरीच चांगली आहे.

    ReplyDelete
  5. zampya said...
    <>

    आता माझ्या टेम्प्लेट मध्ये जे काही आहे त्याला रंगसंगती म्हणणं अवघड आहे कारण मी त्यातून रंगच काढून टाकले आहेत आणि चित्रकलेच्या नियमांप्रमाणे काळा व पांढरा हे रंग नसून छटा आहेत.

    ReplyDelete