बंड वरून आम्ही चालत होतो ते ’पीस’ हॊटेलच्या दिशेनं. जुन्या जमान्यात सर्वाधिक गाजलेलं हे हॊटेल अजून उभं आहे. अजून सुप्रसिद्ध आहे. याचं पूर्वीचं नाव ’कॆथे हॊटेल’. व्हिक्टर ससून या प्रख्यात भारतीय ज्यूनं हे १९३० मध्ये बांधलं.
ससून कुटुंब मूळचं बगदादी ज्यू, पण अनेक पिढ्यांपूर्वी ते भारतात येऊन राहिलं. ब्रिटिशांना अफूच्या व्यापारात मदत करून अपरंपार श्रीमंत झालं. ब्रिटिश राजघराण्यानं व्हिक्टर ससूनला ’सर’ हा किताब दिला होता.
भारतीय स्वातंत्र्ययुद्ध जोरात पेटल्यावर सुरक्षिततेसाठी भारत सोडून तो शांघायला गेला. तिथं त्यानं आपली सारी धनदौलत जमीन-जुमल्यात आणि शर्यतीच्या घोड्यांत ओतली. या शहरात त्याच्या एकूण एकोणीसशे इमारती होत्या. त्यांचा मुकुटमणी ’ससून हाउस’ म्हणजेच त्याचं ’कॆथे होटेल’.
मुंबईला उतरावं तर ’ताज’ मधे, सिंगापूरला ’रॆफेल’ मधे, हॊंगकॊंगला ’पेनिन्सुला’ मधे, तसं शांघायला या ’कॆथे हॊटेल’ मधे असं उच्च वर्तूळात म्हटलं जायचं. त्याचा हिरव्या पिरॆमिडसारखा कळस कुठूनही दिसतो. सर्वात वरच्या बाराव्या मजल्यावर ससूनचं ऒफिस आणि पेंट हाउस होतं. तिथून तो आपल्या जंगी इस्टेटीची देखभाल करी.
हा धनत्तर ससून अतिशय हौशी आणि रंगेल गुलछबू होता. विमान अपघातात दोन्ही पाय निकामी झालेल्या या गृहस्थानं शांघाय गाजवलं. त्याच्या थाटामाटाच्या पार्ट्या, खाने, गाणी-बजावणी, भेटवस्तू, घोड्यांच्या शर्यती आणि लफडीकुलंगडी शांघायमध्ये सर्वांत अधिक चघळली जात. पार्टीला आलेल्या हजारभर पाहुण्यांना भेट म्हणून त्यानं एकदा सोन्याची घड्याळं दिली होती.
दौलतीची ही चढती कमान कम्युनिस्ट राजवट आल्यावर कोसळली. त्यांनी ससूनची सारी जायदाद हिसकावून घेतली. जिथं देशोदेशींचे राजदूत संचार करत असत त्या कॆथेमध्ये हजारो कम्युनिस्ट सैनिक गाडगी-मडकी, सरपण, भाजीपाला, कपड्यांची बोचकी खेचरावर लादून आले. बंदूक हाती दिलेले शेतमजूर ते. असलं वैभव कधी स्वप्नात न पाहिलेलं. त्यांनी घातलेला धुमाकूळ अजब होता. कुणी तास न् तास लिफ्टनं खाली-वर करत. कुणी छपरी पलंगावर उड्या मारत. कुणी संडासच्या कुंडीमध्ये तांदूळ धूत. कुणी आपली खेचरं आतल्या बारला बांधून टाकली. उंची गालिचा लिदीखाली सडला.
सरकारनं हिसकावून घेतलेलं हे हॊटेल १९५३ मधे ससूननं कागदोपत्री सरकारला बहाल केलं. अधिकार्यांकडून मोठ्या मिनतवारीनं देशाबाहेर जाण्याचा परवाना मिळवला आणि शांघायमधून पळ काढला. तो म्हणायचा, ’मी भारत सोडला पण चीननं मला सोडलं!’
पुण्याच्या ससून रूग्णालयात मेडिकल कॊलेजची पाच वर्षं काढलेली असल्यानं जुन्या आठवणींचे लोट आले. इतक्या दूरच्या ठिकाणी इतक्या जवळचं नाव असं आकस्मात भेटत होतं, त्याचा आनंद झाला. पण ज्या ससून कुटुंबानं दक्षिण महाराष्ट्रातल्या लाखो रूग्णांची सोय केली, त्याची दया दुसर्या एका देशाला व्यसनाच्या खाईत लोटून कमावलेल्या पैशावर बेतलेली होती, हे उमगून मन विषण्ण झालं. ’ठेव म्हणून ठेवलेल्या जमिनी विश्वस्तांनीच लाटून, त्यांच्यावर इंग्लिश बॆरिस्टरांच्या जगाला कायदा शिकवणार्या ’इन्स ऒफ द कोर्ट’ या संस्था पूर्ण बेकायदेशीरपणे उभारल्या’ हे सत्य समजल्यावर झालं होतं तसं.
पुढे अनेक वर्षांनी ’पीस हॊटेल’ या नावानं ससूनच्या कॆथे हॊटेलचं पुनरूज्जीवन झालं. पूर्वीसारखं सजवून ते पर्यटकांसाठी उघडलं गेलं. तिथं जाऊन कमीतकमी चहा तरी पिऊन यावं असा माझा मनोदय होता.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हॊटेल पसरलेलं. उजव्या हाताच्या इमारतीत मुख्य प्रवेशद्वार होतं. गेल्या शतकाच्या प्रारंभीच्या ’निओ-क्लासिकल’ शैलीतली सहा मजली देखणी इमारत. तिच्या दुधी आणि शेवाळी रंगसंगतींवर सोनेरी वेलबुट्टी झळकत होती. त्याच रंगांच्या गणवेषातल्या दरवानानं आदबीनं वाकून स्वागत केलं आणि आत पाचारण केलं.
आतली सजावट तशीच भारदस्त. किंचित अंधार्या स्वागत-कक्षात भरगच्च झुंबरं, जाड गालिचे, चमकतं जॊर्जिअन फर्निचर आणि जाड मखमली पडदे होते. हॊंगकॊंगमधल्या चायना-क्लबसारखं पुन्हा एखाद्या इंग्लिश-क्लबमधे शिरल्यासारखं वाटलं.
सुंदर कोरीव जिना. वरच्या मजल्यावर चहापानाची व्यवस्था होती. तिथं जाऊन जुन्या आरामखुर्च्यांमधे सैलावून बसलो. संत्र्याचा रस आणि इथली ’खासियत’ म्हणून सेवकानंच सुचवलेला क्लब सॆंडविच मागवला आणि सभोवती पाहायला लागलो.
नोएल कॊवर्ड गळपट्टा सावरीत आता तिकडून येईलसं वाटलं. येईल सुद्धा! ’प्रायव्हेट लाईफ’ हे त्याचं गाजलेलं नाटक इथंच लिहिलं गेलं होतं. आतल्या खोलीत, लेखकांच्या गराड्यात सॊमरसेत मॊम ’रेझर्स एज’ वाचून दाखवत असेल, की ग्रॆऎम ग्रीनचे खास मित्र त्याला नव्या रहस्यकथेचा प्लॊट सांगायचा आग्रह करत असतील?
पूर्वी सजावट, भोजन आणि मदनमस्त खेळ यांनी वेगळं वलय बहाल केलेलं हे आगळंवेगळं हॊटेल आज जुनाट, मंद आणि किंचित केविलवाणंच वाटत होतं. कर्जबाजारी वतनदारानं आपला पुरातन वाडा कसाबसा तगवून धरल्यासारखं. लठ्ठ चिरूट ओढणारे दोन अमेरिकन, त्यांच्या जाडजूड बायका आणि घसा खरवडत बोलणारे जर्मन. आम्ही वगळता कुतूहलानं जमलेली एवढीच पर्यटक मंडळी आता इथं हजर होती.
मागवलेला खास पदार्थही काही खास नव्हता. तेव्हा दोन ऒरेंज ज्यूसचे ३५० रूपये टिच्चून ’एवढ्या पैशात मुंबईला उडप्याकडे चार जण जेवलो असतो’ असं हळहळत बाहेर आलो. त्या भिकार क्लब-सॆंडविचचे पैसे देण्याचं मात्र आम्ही नाकारलं.
चीनी माती (लेखिका - मीना प्रभू)
No comments:
Post a Comment