काही काळापूर्वी मी शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होतो तेव्हाची गोष्ट. माझ्याकडे येणार्या विद्यार्थ्यांमध्ये सातवीत शिकणारा वरद नावाचा एक चुणचुणीत मुलगा होता. तो अतिशय जिज्ञासू आणि अभ्यासू असल्याचे माझे निरीक्षण होते. एकदा मात्र इतिहासाचा विषय निघाला असता तो अचानक काही कारणाने उत्तेजित झाला. इंग्रजांनी आपल्यावर अनन्वित अन्याय अत्याचार केले असून तिथे जाऊन आपणही त्यांचा तशाच प्रकारे बदला घेतला पाहिजे. इंग्लंडमध्ये जाळपोळ करून तो देशच नष्ट केला पाहिजे वगैरे, वगैरे. त्याला आधी मी शांत होण्यास सांगितले. नंतर थोड्या वेळाने मी त्याला त्याचे विचार ऐकून मला कुठलाही धक्का बसला नसल्याचे सांगितले. बर्याच वर्षांपूर्वी माझेही असेच काहीसे विचार होते परंतू ते कालांतराने पूर्णत: बदलले असल्याचेही सांगितले. माझ्या विचारांमध्ये असे परिवर्तन नेमके कशामुळे घडून आले हे जाणण्यास वरद उत्सुक होता. त्याला मी हा सारा घटनाक्रम थोडक्यात समजावून सांगितला तो अशा प्रकारे -
मी तिसरीला असताना आम्हाला शालेय अभ्यासक्रमात थोरांची ओळख हे पुस्तक इतिहास या विषयाकरिता होते. या पुस्तकात दादाभाई नौरोजी, लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास करमचंद गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, चित्तरंजन बोस इत्यादी स्वातंत्र्यपूर्व काळातील नेत्यांची सचित्र माहिती नमूद केलेली होती. बहुतेक पाठांमध्ये इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या जुलूम, अत्याचारांचे अंगावर शहारे आणणारे वर्णन होते. विशेषत: लाला लजपतराय यांनी सायमन कमिशनचा काळे ध्वज दाखवून आणि सायमन गो बॅक अशा घोषणा देऊन निषेध केला होता तेव्हा त्यांना इंग्रजांनी छातीवर दंडुक्यांनी मारहाण केली, त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला वगैरे वाचून तर मी फारच अस्वस्थ झालो. तेव्हा रात्र रात्र मला झोप येत नसे. इंग्लंड अतिशय क्रूर, दुष्ट लोकांचा देश आहे. कुठल्याही प्रकारे त्या देशात घुसून तेथील वीजवाहक तारांना आगी लावून तो देश नष्ट केला पाहिजे (वीजवाहक तारांना आग लागल्यास ती आग जिथे जिथे तारा पोचल्या आहेत अशा सर्व ठिकाणी फार वेगाने पसरते इतपत सामान्य ज्ञान मला त्या वयात होते) वगैरे विचारांनी मी अतिशय तळमळत असे. एकतर असे काही करणे मला तेव्हा (आणि आजदेखील) अजिबात शक्य नव्हते. शिवाय हे असे स्फोटक (?) विचार कुणाला बोलून दाखवायची देखील सोय नव्हती. त्यामुळे दिवसेंदिवस माझी बेचैनी वाढतच होती.
तशातच माझ्या एका मित्राची बहीण जी जळगावला राहत होती, काही कारणास्तव पुण्याला राहायला आली. तीदेखील जळगावात तिसर्या इयत्तेतच शिकत होती. अर्धे शैक्षणिक वर्ष जळगावच्या शाळेत व्यतीत केल्यावर तिने पुण्यातल्या शाळेत जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा आमच्या वर्गशिक्षिकेने (तेव्हा आम्हाला सर्व विषय शिकवायला एकच शिक्षिका होत्या) तिची इतर सर्व विषयांची पुस्तके बरोबर आहेत परंतू भूगोलाचे पुस्तक मात्र नव्याने विकत घ्यावे लागेल असे तिला सांगितले. तिच्याजवळ असलेले भूगोलाचे पुस्तक न चालण्याचे नेमके कारण काय असावे या कुतूहलापोटी मी ते पुस्तक पाहू लागलो आणि आपल्याच जगात वावरणार्या त्या वयातल्या मला धक्काच बसला. तिच्या भूगोलाच्या पुस्तकावर लिहिले होते आपला जळगाव जिल्हा. आम्हा सर्वांच्या भूगोलाच्या पुस्तकावर लिहीले होते आपला पुणे जिल्हा.
विचारांचा धक्का विजेच्या धक्क्यापेक्षाही तीव्र असतो असे म्हणतात. मलादेखील ह्या वैचारीक धक्क्याचा मोठा परिणाम जाणवला. यानंतर माझी विचार करण्याची दिशाच बदलून गेली. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन अमूलाग्र बदलला. म्हणजे कसे ते पाहा - जळगाव पुण्यापासून साधारण चारशे किमी लांब आहे. पुण्यातले विद्यार्थी तिसरीच्या भूगोलात पुणे जिल्ह्याचा अभ्यास करतात तर जळगावचे विद्यार्थी जळगावचा. चौथीत दोघांचा भूगोल समान असणार कदाचित कारण चौथीत महाराष्ट्राचा अभ्यास आहे पण तेव्हा दुसर्या राज्यात पुन्हा वेगळाच भूगोल असणार. पाचवीत तोदेखील समान असेल कारण संपूर्ण भारताचा तेव्हा भूगोलाच्या अभ्यासात समावेश आहे पण दुसर्या देशाचे विद्यार्थी त्यांच्याच देशाचा अभ्यास करतील. पुढे जेव्हा वरच्या इयत्तेत जगाचा भूगोल शिकविला जाईल तेव्हा कदाचित सर्व जगातल्या विद्यार्थ्यांचा भूगोल समान असूही शकेल पण मग इतिहासाचे काय?
प्रत्येक देश / प्रांत / राज्य विद्यार्थ्यांना स्वत:चा इतिहास शिकवतील पण आंतरराष्ट्रीय इतिहास शिकवायची वेळ येईल तेव्हा ते सार्या गोष्टी स्पष्टपणे मांडू शकतील काय? शंकाच आहे. इंग्लंडच्या विद्यार्थ्यांना इतिहासात असे शिकविले जाईल का की आपण भारतावर राज्य केले, त्या देशाला गुलामगिरीत जखडले, तेथील जनतेवर अन्याय, अत्याचार, जुलूम जोर जबरदस्ती केली वगैरे, वगैरे. अर्थातच अशी कोणतीही शक्यता नाही. उलट तिथल्या विद्यार्थ्यांना अशी माहिती पुरविली जात असणार की भारत हा एक अति मागासलेला देश होता. त्यास इंग्लंडच्या राज्यकर्त्यांनी नवीन तंत्रज्ञान, लोकशाही वगैरे बाबी शिकवून एक विकसनशील देश म्हणून उभे केले व त्या बदल्यात भारताच्या जनतेने कृतघ्नपणे इंग्रज अधिकार्यांना हाकलून लावले इत्यादी, इत्यादी. म्हणजेच आपण म्हणणार की ते चूकीचा इतिहास शिकवित आहेत. मग कशावरून आज आपण आपल्या विद्यार्थ्यांना जो इतिहास शिकवित आहोत तो खरा आहे? शंभर टक्के प्रामाणिक आहे?
त्यानंतर मी कुठल्याही गोष्टीकडे फारसे उत्तेजित न होता पाह्यचे ठरविले. ह्याचे कारण आपणांस जी माहिती प्रथम पुरविली जाते, कालांतराने त्याच्या अगदी उलट माहिती तितक्याच ठामपणे आपल्या समोर येते. उदाहरणार्थ, मोहनदास करमचंद गांधींविषयी शालेय जीवनात अगदी पाचवीपर्यंत मला अतिशय छान, आदर वाटावा अशी माहिती अभ्यासातून, इतर व्याख्यानातून मिळत होती पण पाचवीत मी गोपाळ गोडसेंचे पंचावन्न कोटींचे बळी हे पुस्तक वाचले. ह्या पुस्तकात गांधींविषयी माझ्या पूर्वीच्या माहितीला छेद देणारी अतिशय वेगळीच माहिती वाचनात आली. यानंतर पुढे अनेक ठिकाणी गांधींविषयी उलट सुलट लिहिलेले आढळले. नेमका कशावर विश्वास ठेवायचा?
पुढे मी सातवीत असताना बाळासाहेब भारदे यांचे व्याख्यान ऐकले. ते म्हणाले, "तुम्ही भारताचे नागरीक आहात काय? भारताचा नागरीक असणे म्हणजे पाकिस्तानचा द्वेष करणे असे जर तुम्हाला वाटत असेल तर माझे तुम्हाला कळकळीचे सांगणे आहे की तुम्ही भारताचे नागरीक होऊ नका. विश्वाचे नागरीक व्हा. तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी शिकविलेला सर्वच इतिहास खरा असेलच असे नाही. शेजारी राहणार्या दोन कुटुंबांमध्ये भांडणे असतील तर प्रत्येक कुटुंबातले आईवडील त्यांच्या मुलांना आपण कसे बरोबर आहोत आणि आपल्या शेजारचे कसे चूक आहेत हेच शिकवित राहणार. आता यात खरे काय आणि खोटे काय? वस्तुस्थिती माहित नसणारी त्या कुटुंबातली मुले तेच वैर पुढे वाढवित राहणार. शेजारी असणार्या दोन राष्ट्रांबाबतही अशीच परिस्थिती आहे. तुम्ही नव्या पिढीचे प्रतिनिधी आहात. पुर्वग्रहदूषित विचारसरणी बाळगून शत्रूभाव जपण्यापेक्षा खुल्या मनाने विचार करा. भूतकाळात कोणाची चूक होती हे शोधण्याचा प्रयत्न करू नका. कदाचित खरे काय ते तुम्हाला कधीच कळणार नाही. दोन्ही बाजूचे आपापल्या परीने आपण सांगतोय तेच सत्य असे भासवायचा प्रयत्न करतील. तेव्हा भूतकाळात कदाचित आपल्याही पूर्वजांकडून काही चूका झाल्या असण्याची शक्यता आहे हे समजून घ्या. नव्याने संबंध प्रस्थापित करा तरच भविष्यात शांततेने जगणे शक्य होईल." भारदेंच्या भाषणाने माझा ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिकच व्यापक झाला.
याच दरम्यान हिंदू व मुस्लीम यांच्यात वैर कसे सुरू झाले ह्याविषयीची एक कथा माझ्या वाचनात आली ज्यामुळे आक्रमक धार्मिक युद्धांच्या मागची कारणे काय असू शकतील हे मला उमजले. ती कथा थोडक्यात अशी -
तर ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा हिंदु व मुस्लिम धर्मात वैर नव्हते. हिंदुंच्या राज्यात मुस्लिम व मुस्लिमांच्या राज्यात हिंदु राहत होते. असाच एक हिंदु मनुष्य मुस्लिम राजवटीच्या प्रदेशात राहत होता. कष्ट करून पोट भरणारा तो एक अतिसामान्य तरूण होता.
तो त्याच्या कामानिमित्त राजवाड्यासमोरील रस्त्यावरून जात असताना राजकन्या त्याला सज्जातून पाहत असे. असे पाहणे अनेकदा झाल्यावर तिला असे जाणवले की तिला तो आवडू लागला आहे. तिने आपल्या वडिलांना म्हणजेच त्या प्रदेशाच्या राजाला आपण त्या तरूणाशी विवाह करण्याची इच्छा बाळगून असल्याचे सांगितले.
राजाने अर्थातच या गोष्टीला संमती दिली नाही कारण हा तरूण एक सामान्य नागरीक होता. (धर्माचा मुद्दा राजाने मांडला नाही कारण राजाला त्याचा धर्मच माहित नव्हता. परंतू रस्त्यावरून पायी चालत जाणारा म्हणजे सामान्य व आपल्या तोलामोलाचा नक्कीच नाही हे त्याला सहज कळले)
परंतू काही दिवसातच राजाच्या लक्षात आले की राजकन्येने त्या तरूणाचा ध्यास घेतला आहे व तिचे सदर तरूणाशी लग्न लावले नाही तर ती सदैव दु:ख करीत राहील. शेवटी राजा एकदाचा तयार झाला. नाहीतरी त्याला ती एकुलती एक कन्या होती. तिच्या सुखाकरिता एवढी तडजोड करायला तो तयार झाला. त्याने सेवकांना सांगून त्या तरूणास बोलावून घेतले.
त्या तरूणाला राजाने राजकन्येची इच्छा बोलून दाखविली व तिच्या इच्छेप्रमाणे तिच्याशी विवाह करण्यास सांगितले.
त्या तरूणाला एवढे ठाऊक होते की या राजाचा आणि आपला धर्म एक नाही. त्याने या प्रस्तावास स्पष्ट नकार दिला. राजाला हा सरळ सरळ स्वत:चा अपमान वाटला. त्याचप्रमाणे राजकन्या कष्टी होईल याचीही कल्पना आली.
राजाने त्या तरूणाला ’राजकन्येशी विवाह कर’ असा हुकूम दिला अन्यथा सेवकांकरवी त्याचे प्राण घेण्याची धमकी दिली.
ही धमकी ऐकताच इतका वेळ आतल्या दालनात असलेली राजकन्या धावत दरबारात आली व तिने राजाला सांगितले की या तरूणावर कोणतीही जबरद्स्ती करू नये तो स्वेच्छेने तयार असेल तरच हा विवाह आयोजित करावा.
राजकन्येने दरबारात प्रवेश केला तसे एकदम चित्रच पालटले. मुख्य म्हणजे त्या तरूणाने तोपर्यंत कधी राजकन्येला पाहिलेच नव्हते. त्यामुळे राजकन्येचे प्रेम तसे पाहता एकतर्फीच होते. परंतु राजकन्येला त्याने दरबारात त्यावेळी पाहिले आणि तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून तो ही तिच्या प्रेमातच पडला. आता काहीही करून हिच्याशी आपले लग्न झालेच पाहिजे असे त्यालाही वाटून गेले.
मग त्याने आपला लग्नासाठी आधी व्यक्त केलेला ठाम नकार रद्द करीत ’राजकन्या जर हिंदु धर्मात यायला तयार असेल तर मी लग्न करीन’ असा सशर्त होकार दिला.
राजाने ह्या अटीला संमती दिली. मग तो तरूण त्या राजकन्येला घेऊन स्थानिक हिंदु पंडिताकडे गेला. त्या पंडिताने राजकन्या म्लेंच्छ असल्याने तिला शुद्ध करून घ्यावे लागेल असे सांगितले. सदर शुद्धीकरण करण्यासाठी यज्ञाचे आयोजन व त्याकरिता आहुती / दक्षिणा आदींची मोठी मागणी केली. ती अर्थातच पुरविण्यात आली. त्यानंतर अनेक धार्मिक विधी / पुजा अर्चा करण्यात आल्या. या सगळ्या नंतर ही पुन्हा मोठे ग्रंथ / पोथ्या चाळून संदर्भ शोधण्यात आले आणि स्थानिक पातळीवर त्या राजकन्येचे शुद्धीकरण शक्य नसून तिला यापेक्षा मोठ्या धर्मपीठा समोर जाण्यास सांगण्यात आले.
पुन्हा एक पातळी वर च्या धर्मपीठात ही याच गोष्टींची पुनरावृत्ती घडली. फक्त यावेळी आहुती / दक्षिणा यांच्या मागणीत वाढ झाली. शिवाय धर्मग्रंथ / पोथ्या यांच्या वाचनाकरिता पंडितांची संख्या जास्त होती त्यामुळे अर्थातच वेळही जास्त खर्च झाला. पण निष्कर्ष शेवटी तोच. राजकन्या शुद्ध होऊ शकत नाही
(जरा आठवून पाहिल्यास आपल्या असे लक्षात येईल - ज्ञानेश्वरादी भावंडे - संन्याशाची मुले म्हणून अशुद्ध घोषित करण्यात आली व पुढे त्यांना शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत अशाच काही गोष्टी घडल्या होत्या. असो.)
असे करता करता शेवटी सर्वोच्च अशा काशीक्षेत्री तो तरूण त्या राजकन्येला घेऊन पोचला. सदर वाटचाली दरम्यान ती राजकन्या त्या तरूणाची मनोभावे सेवा करीत होती या सर्व काळात त्याला तिच्यातील सौंदर्याशिवाय असण्यार्या इतर गुणांमुळेही ती अतिशय आवडू लागली. तिच्याशिवायआपण जगू शकणार नाही याची ही त्याला खात्री झालीच. काशीक्षेत्री काय फैसला होणार याचा अंदाज त्या तरूणाला आलाच होता. अर्थात अपेक्षेप्रमाणे तिथे देखील नकार घंटाच वाजली.
त्यानंतर ती राजकन्या व तो तरूण पुन्हा राज्यात आले व राजाला सर्व वृत्तांत कथन केला. राजा व राजकन्या या दोघांनी ही परिस्थिती पुढे नमते घेत विवाहाचा नाद सोडून दिला व त्या तरूणास निरोप देण्याची तयारी केली.
स्त्रिच्या प्रेमात मूलत:च एक त्यागाची भावना असते. त्यामुळे आपणाला आपले प्रेम मिळत नसल्यास त्या ते वास्तव चटकन स्वीकारतात. याउलट पुरूषांची लालसा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांचे प्रेम हे ’हक्कप्रधान’ असते. ते मागणी करीत राहते.
इथे ही असेच घडले. तो तरूण च आता राजकन्येच्या प्रेमात पडला होता. रिकाम्या हातांनी परतणे त्याला शक्यच नव्हते. त्याने सरळ राजाला विचारले, " ही हिंदु होऊ शकत नसली तरी काय झाले? मी मुसलमान व्हायला तयार आहे. तुम्ही मला तुमच्या धर्मात घेऊ शकाल काय?"
राजाने ह्या गोष्टीला अत्यंत आनंदाने होकार दिला. मुस्लीम धर्मात प्रवेश करणे अतिशय सुलभ असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मग तो तरूण मुस्लीम बनला आणि त्याने राजकन्येशी विवाह केला. त्यांचा संसार अतिशय सुखाचा झाला.
कालांतराने राजाने त्याचे राज्य आपल्या जावयाच्या सुपूर्त केले. आता हा नवीन राजा म्हणजे आपला कथानायक पुर्वाश्रमीचा हिंदु तरूण.. आणि याच्या प्रेमकहाणीतील त्यावेळचे खलनायक कोण तर हिंदुच्या धर्मपीठातील धर्म मार्तंड व तथाकथित आधिकारी व्यक्ति ... ज्यांनी आहुती / दक्षिणा वसूल करण्याखेरीज कुठलीही सश्रध्द क्रिया न करता आपल्या अधिकारात एका परधर्मीय निष्पाप तरूणीला हिंदू धर्मात येण्यास विनाकारण रोखून धरले होते.
तेव्हा या नवीन राजाने राज्यावर येताच आपल्या सैनिकांना हुकुम सोडला ....
"हिंदूंची देवळे तोडा.. लुटा... तेथील धर्मरक्षकांची कत्तल करा..."
त्यांनतर त्याने त्याच्या वारसांनाही हीच शिकवण दिली. आणि यानंतरच हिंद आणि मुसलमान या दोन धर्मात वैर सुरू झाले.
बाटगा जास्त कडवा असतो ही म्हण ही या घटनेनंतरच उदयास आली.
(कथा समाप्त)
सदर कथा मी रचलेली / लिहिलेली नाही. कोणाच्या भावना यामुळे दुखावल्यास मी जबाबदार नाही. त्याचप्रमाणे ही कथा कुठल्याही मुसलमान अथवा अन्य धर्मीय व्यक्तिने सांगितली नसून स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांनीच त्यांच्या एका भाषणात सांगितली होती.
सदर भाषणाचा वृत्तांत व ही कथा ’शतपैलू सावरकर’ (लेखक - ह. त्र्यं. देसाई) या पुस्तकात वाचण्यास मिळेल. ही कथा ज्या काळात घडली त्या काळात मी जन्मलो नसल्याने तिच्या सत्य / असत्यते विषयी मी काहीच भाष्य करू शकत नाही परंतू ती कथा त्या पुस्तकात असल्याचे व मी शाळेत असताना ती वाचल्याचे मला आठवते.
हे सर्व स्पष्टीकरण ऐकल्यावर वरदच्या विचारांमध्ये बराच फरक पडला.